Tuesday, February 12, 2019

अंगाई


हळू हळू हळू हळू  , मिट  डोळे आता बाळा
सोनियाच्या पावलांत ,चांदीचा रे शोभित वाळा ।।ध्रु ।।

चांदोमामा आला बघ रे, सूर्य लोपे आभाळात
आभाळात  लावीत दिवे , आल्या चांदण्या खेळत ।।१।।

रातराणी रे उठली , पसरला गोड  वास
आजूबाजूच्या मैत्रिणी , झोप घेती निश्वासात ।२।।

निज बाळा तू हि आता, झोप माझ्या रे कुशीत
बाळमुठी आपोआप, जाती मुखी रे खुशीत ।।३।।

सौ. विस्मयी बोकील.
१३-२-२०१८

 माझे इवले गोकुळ .. 




माझ्या इवल्याश्या संगे रंगे  इवले गोकुळ.. माझे इवले गोकुळ . ।
जातो कसा बाई वेळ अस्सा चोरपावलाने || धृ ।।


त्याच्या पावलात  माझा जीव मागे घुटमळे ।
जात कामाला  बाहेर कानी वाजती ग वाळे ।।१।।


त्याचे लाघव आठवे , हसू  गालावर खेळे ।
काम राहिले बाजूला माझे पाझरले डोळे ।।२।।


बाळ बसता अंगणी  पसरून खेळ सारे ।
माझ्या घरात सुखाचे बाई वाहती ग वारे ।।३।।


माझ्या इवल्याश्या संगे रंगे  इवले गोकुळ.. माझे इवले गोकुळ .. ।
जातो कसा बाई वेळ अस्सा चोरपावलाने ||

सौ. विस्मयी बोकील.