Thursday, May 31, 2012

अजि म्या ढेकुण पाहिला

रात्रभर आपल्याला चावणारा प्राणी हा डास नसून पुण्यभूमीतला  प्रसिद्ध ढेकुण आहे हें कळल्याबरोबर माझ्या  पाठीखालाची गादीच सरकली.
पुणे तिथे काय उणे असा पुण्यातला खास करून पुणे गावातला  प्राणी ..
इतके दिवस दादा , वहिनी ,ताई यांच्याकडून ढेकूणाच्या  सुरस कथा ऐकताना मजा वाटली होती ,रत्नागिरी- पुणे गाड्यात ते कसे tickets बरोबर free service  मध्ये येतात हें ऐकल होत
 ,पण आपल जळत कि कळत तस आपल रक्त गेल कि खाजत अस काहीस झालं .
तर असा हा इतके वर्ष नाव ऐकून असलेला पराक्रमी,रक्त पिपासू प्राण्याने मला साक्षात दर्शन दिले होते.
सुरवातीला गादीवर काहीतरी तुरुतुरु  चालताना दिसलं..
अस्मादिकांच्या डोक्यावर तुरळक आणि विरळ जंगल असल्या कारणाने मुळातच समस्त स्त्री वर्गाच्या डोक्यात सुखेनैव वावरणाऱ्या जीवांचा अभावच होता , आणि आता अचानक हें कोण  अशा विस्मयचकित नजरेने ती  चाल तुरुतुरु मी पाहत होते ,अचानक माझी नणंद तिथे आली आणि म्हणाली हा ढेकुण ...मी दचकले ..
राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न झाले आणि ते सुखासमाधानाने नांदू लागले तस काहीस माझही चाललं होत .
आईच्या घरातला बॉम्ब आता दुसऱ्याच्या घरात पडला होता ती सुखात होतीच आणि माझंही आता लग्न ,पूजा ,गोंधळ ह्यातून routine सुरु झालं होत .
गावातल्या घरातून लग्नाला म्हणून नातेवाईक राहायला आलेले ,त्यांच्या bags  मधूनच ह्या सैन्याने आमच्या घरात शिरकाव केला होता.
लग्नाचा गोंधळ संपला आणी ह्या मंडळींनी पुरेशी  कुमक  जमवत आपला गोंधळ घालायला सुरवात केली.
सासू सासऱ्यांच्या खोलीत bags  असल्याने तिथून ह्या लढाईला तोंड फुटले
ती दोघ आणि नणंद (जिची  bag त्यांचा किल्ला होती ) hall मध्ये झोपायला लागले , रात्री त्या खोलीत कुणीच नाही म्हटल्यावर हें प्राणी  bedroom  मधून hall मध्ये यायला लागले
येत येत वाटेत आमची  bedroom  लागल्यावर  सहजच इथे काय आहे पहाव तसे काही  जण आमच्याकडे वाट वाकडी करून आले.
एक दिवस मज्जाच झाली ,सकाळी चेहऱ्यावर पाणी मारल आणी आरश्यात पाहिलं तर बाजूला भिंतीवर १०-१२ ढेकुण ..माझी बोबडीच वळली..
झालं  अस होत ,लग्नाआधी मी सुईच्या टोकाएवढी काळी टिकली विशाल भालपटावर टेकणारी आता नवीन वधु वगेरे मुळे जरा ४-५ फुटांवरच्या  लोकांना डोळे मोठे करून दिसेल एवढी टिकली लावायला सुरवात केली होती . त्यातली  एक टिकली छोटा गोल ,त्या खाली आणि एक छोट्टासा गोल अशी थोडक्यात सांगायचं  ढेकुणाच्या आकाराची .. ह्या टिकल्या रोज मी आरश्याच्या बाजूला भिंतीवर चिकटवायचे ..झटांझट मी सगळ्या टिकल्या  सिंक मध्ये टाकून दिल्या .
हळू हळू ४ दिवसात माझ ढेकुण प्रेम इतक वाढल कि कंसाला जसा जळी स्थळी काष्ठी पाषाणी जसा कृष्ण दिसायचा तसे मला ढेकुण दिसायला लागले होते.
पंख्याच्या वर ceiling ला असलेलल्या डासात मला ढेकुण दिसायला लागला,भिंतीवरच्या काळ्या ठिपक्यात मला तोच दिसायला लागला
अस प्रेम माझ्या नवऱ्यावर हि जडल नसेल माझ !!
घरात सासूबाई नणंद ,विस्मयी तो बघ ढेकुण तिथे तुझ्या मानेवर अस करून माझी फिरकी घ्यायला लागल्या होत्या
मी सोफ्यावर बसताना बारीक नजरेने ते कुठे आहेत का पहायचे आणि बसायचे.
ढेकुणाचा पण season  असतो का? उन्हाळ्यात ते येतात का?पावसात ते जातील का?रॉकेल ,डांबर गोळ्यांनी ते जातील का? असे प्रश्न मी आडून आडून विचारायला लागले पण हाय रे कर्मा सगळ्या प्रश्नांची negative  उत्तर यायला लागली .
मी ते मारू का विचारलं तर नवरा म्हणायचा नको मारू एक मारला कि त्याच्या रक्तातून १०० ढेकुण जन्माला येतात.हें ऐकून मला तो प्राणी रावणाच्या वंशावळीतला आणी कलियुगातला चमत्कारी प्राणी वगेरे वाटायला लागला होता .
एके दिवशी माझ्या नवरयाने जादुगाराने काही हवेतून काढावं त्या उत्साहाने  उश्यांच्या  कोनातून असे ३-४ ढेकुण काढून दाखवलन आणि माझं उरला सुराला धीर संपला
त्या उश्या ,लोढ खोलीतून हद्दपार होऊन बाल्कनीत गेले .
कुणी painting  केल कि ढेकुण नाही येणार म्हटल्यावर माझ्या अंगातल ढेकुणांनी जेवढ रक्त शोषल होत तेवढ परत वाढल ..
अखेर गावातून औषध ,पंप  अशी आयुध आणली गेली. सासू सासऱ्यांच्या रूम मध्ये रात्रीची वेळेला त्यांच्या वर हल्ला करायचा ठरला,माझं नवऱ्याने half pant ,कुडतं आणि तोंडाला नक्षलवाद्यासारखा फडका बांधला आणी सगळ्या रूम मध्ये फवारणी चालू झाली, सगळी रूम ओली करण्यात आली.
आधी मी कौतुकाने तो ढेकुण वधाचा सोहळा पाहत होते पण ५ मिनिटातच अतिशय प्राणघातक वासाने मला हैराण केल,हा वास आपल्याला येवढा तापदायक तर ते छोटे जीव नक्क्की मरणार ह्या विश्वासाने मी बाहेर आले. औषध फवारून झालं खोलीच दार बंद करण्यात आले ,माझं  नवऱ्यात  आता मला हिटलर चा अंश दिसायला लागला होता पण कुछा हिटलर अच्छे होते हें !!
लहान मुलं जशी ice -cream  फ्रीज मध्ये set करायला ठेवलं असताना हज्जार वेळा ते झालय कि नाही बघतात तसा  माझा नवरा उत्सुकतेने  खोलीच दार उघडून आत आपण केलेल्या साहसाची फळे पाहत होता ह्या भानगडीत थोडीफार सेना पाठीला खर तर " ढू" ला पाय लावून बाहेर पडली. काहींनी असहाय्य होऊन बाथरूम मधल्या पाण्याच्या बादलीत जीव दिला
आता आमच्या हि खोलीत औषध  फवारणे आवश्यक आहे ,ह्या वेळी दिवसाढवळ्या हल्ला करायचा आहे..मी आज घरी पोहोचले कि  तो ढेकुणकाळ संपलेला असेल  अश्या आशेने ऑफिसला आले आहे.
आता मीही स्वत: थोडी फार का होईना ढेकुण-अनुभव  समृद्ध अशी असल्याने , भुतांच्या गोष्टी जश्या अनुभवी व्यक्ती रस घेऊन सांगतात तशा मीही ढेकुण कथा सांगेन .
अशी हि ढेकुण कथा साठा उत्तरी सुफळ संपूर्ण !!

1 comment:

  1. ढेकूण हा प्राणी जिथे जातो, तिथे तो तिथलाच होऊन जातो. त्याचं समूळ उच्चाटन ही अशक्य गोष्ट आहे.

    Lekh zakass...!
    Office madhun ghari lavkar ja... Dhekun wat baghat astil...!

    ReplyDelete