Tuesday, December 11, 2012

चुकवलेल्या वाटा






दुपारी अवेळीच बेल वाजली , आईने माझ्याकडे पाहिले आणि कोण असणार हे समजून आम्ही दोघी हसलो .
मी दार  उघडले, समोर ती दुक्कलच उभी होती, मी  पुन्हा आईकडे  हसून पाहिले.
सरावल्यासारखेच ते दोघे आत आले आणि सोफ्यावर येऊन बसले .
आईपण  उठून खुर्चीवर जाऊन बसली, आतल्या खोलीत झोपलेले बाबाही उठून बाहेर येऊन बसले.
सगळ काही शिस्तीत झाल्यासारखे त्या दोघांनी बोलणे सुरु केले , आणि आम्ही तिघेही हळू हळू त्यांच्याशी संवाद साधायला लागलो .
ते दोघे जुळे , दिसायला अगदी एक सारखे , काळा  पण चमकदार रंग  आणि डोळ्यात तेजाची चमकही एकसारखीच..
फक्त फरक काय तो बोलण्याच्या पद्धतीत .. एक किती सांगू नको किती नको असा बेभान होऊन बोलणारा एक संयमी ,शांत पणे  बोलणारा  .. त्या पध्दती  वेगळ्या असल्या तरी समोरच्यावर तितक्याच सारख्या प्रभाव टाकणाऱ्या .
मागच्या वेळी वाचायला नेलेले पुस्तक एकाने समोरच्या टेबलवर  ठेवले  आणि ते पुस्तक का आवडले , काय आवडल नाही हे सांगायला सुरवात केली . आम्हीही हसून त्यांचे बोलणे ऐकत होतो.
मग आम्हीही तुम्हाला मोठेपणी कोण होयचं अशी ठराविक साच्यातले प्रश्न विचारायला सुरुवात केली.
शांत असणारयाने   मला शिक्षक होयचे आहे मी मास्तर होणार मोठेपणी.. असे उत्तर दिले
अस का  वाटत तुला विचारल्यावर त्याने  " ते आपल्याला  शिकवतात, छान छान गोष्टी सांगतात, कस वागाव हे शिकवतात ,मला शिकवायला आवडते" अशी खूप उत्तर दिली
दुसऱ्या ने  मात्र मी काही शिक्षक नाही होणार मला  डॉक्टर  होयचंय  अस उत्तर दिल

अशीच ती मुल  समोरच्यांकडे आली कि आमच्याकडे येत होती आणि गप्पांनी आम्हाला वेड  लावत होती
त्यांच्यातले ते तेज हे दोघे नक्की काही बनणार मोठेपणी हे सुचवून जात होते,जुळे असून विचारांचे वेगळेपण आम्हाला दिपवून जात होते,यांच्यात काहीतरी spark आहे असे राहून राहून वाटत होते .

पण एक दिवस अचानक कानावर आल कि बापाने दुसरे लग्न केले , मोठ्या मुलीचे १८ वर्ष होते न होते तोवर आपल्या गावाचाच कुणी पाहून लग्न लावून दिले उरले हे दोघजण  ते  खोट बोलतात , शाळेत मस्ती करतात अशा तक्रारी आमच्या  कानावर यायला  लागल्या 
त्या समोरच्या आजीनीही मुलांविषयी हीच तक्रार केली , आम्हाला नाही हो मुल तर अशी वाटत नाही हि वेडी आशा होतीच.
बापाने कुठून वशिला लावला कळला नाही पण बालसुधारक गृहात त्यांना प्रवेश घेतला , तोवर गुन्हेगार चोरी वगैरे  करणारी मुलच पोलीस त्यात भरती करतात असा  आमचा समज होता .वसतिगृह नावाखाली मुल तिथे राहायला गेली.
क्वचित स्व:ताच्या  लहान सावत्र भावाला घेऊन येत होती , तो तर येवढा शैतान कि समोरच्या बैलाची शिंग पकडायला धावायचा आणि हे त्याच्या मागून धावायचे.
कधी तरी सुट्टीला घरी आले कि ती आमच्याकडे येत होती तिथे कसा tv  चालू असतो , बाकी मुलांमुळे अभ्यास होत नाही हे त्यातला एक सांगत होता.पोळ्या ,भात कसा कमी देतात हे सांगत होती .
हळू हळू  त्यांच्या डोळ्यातील त्या तेजाची जागा आता त्या सुधारक गृहातल्या मुलांच्या कुतूहलाने घेतली होती.
ती मुल कशी चोरी करायची, एकाने कस आईला फसवून पैसे चोरले अशी रसभरीत वर्णने आम्हाला ऐकायला मिळत होती  .
 एकदा  तर वाचायला नेलेल्या  पुस्तकच कव्हर  स्व:ता कडे ठेवून  त्यांनी तसाच ते पुस्तक आणून दिल तेह्वा हळू हळू त्यांच्यातला हा  बदल लक्षात येत गेला .
आम्हीही मग त्याचं येण  कमी होईल हे पाहत गेलो .बाहेर जायचं आहे ; नंतर बोलू अशी फुटकळ कारण देऊ लागलो मग त्यांनी दुसर घर घेतल आणि आपोआपच त्यांचा येण कमी होत गेल.
आम्हीही ते ऐकण्या खेरीज दुसर काय करणार होतो? आमच्या मुलांच  आम्ही पाहू हेच ऐकायला मिळाल असत ,आम्ही मुलांसाठी काही करू शकत नाही हि बोच मनाला लागत होती पण शेवटी त्यांच्या नशिबावर सगळ सोडून आम्ही तो विषय सोडून दिला.

  चुकलेल्या वाटांवरून ज्याने कान पकडून वाट दाखवायची त्यानेच त्यांना चुकीच्या वाटेवर आणून सोडलं होत  का ?, त्यांच्या चुकवलेल्या वाटा  त्यांना कुठे नेऊन सोडणार होत्या ? का शोधतील त्यांच्या डोळ्यातल्या तेजाने ते  आपल्या हरवलेल्या वाट परत?

Wednesday, August 22, 2012

"आये"चा ल्योक ..

आज एकटीच BusStop वर थांबलेले ..company bus यायला अजूनही ५ मिनिट वेळ होता..
नोकरीच काय हें काय ते काय डोक्यात अनंत विचारांची गर्दी
एकटी असले कि सवयीने कानात headphone  घुसावायचा  आणि गाणी ऐकत बसायच.. सवयीने मी headphone कानात घुसवला , इतक्यात दिसलं एक पेपर  विकणारी बाई
पेपरांच्या गठ्यांची मांडामांड करत होती,
एक तारेची जाळी ४ टेकू देऊन रस्त्याशेजाराच्या धुळीत मांडलेली होती आणि त्यावर
वेगवेगळ्या भाषेतले पेपर मांडण्यात  ती दंग होती,शेजारीच तिचा मुलगा खेळत होता ,५-६  वर्षाचा असावा कदाचित ..
तो हि आईला पेपर मांडण्यात मदत करत होता .
पेपर मांडून  झाले म्हटलं आता हें पोरग बसून राहील, तेवढ्यात त्या टुई एवढ्या पोराने  पेपरवाले  मोठी छत्री लावतात ती उचलली..
हा २ फुटी पोरगा आणि छत्री चार साडेचार फुटी अस ते वयात समीकरण जुळवता जुळवता
त्याच तोल जात होता..
एका हाताने छत्री धरली होती आणि एका हाताने तो ती उघडायचा प्रयत्न करत
होता,हें करता करता इकडे तिकडे झेपा जात होत्या तरीही त्याने चिकाटी सोडली
नव्हती
आता मी कानातला हेडफोन काढला  आणि त्याच्याकडे  पाहू लागले..
चेहरयावर  ना कुठे त्रास ना वैताग.. ते पोरग हि स्थिती हि एन्जोय  करत होत...
मधूनच आपल्या झेपा जाण्यावर हसत होत...
मग त्याने त्या छत्रीचा दंड आपल्या पोटावर रुतवला आणि छोट्याश्या हाताने ती
उघडण्याचा प्रयत्न करू लागला .
आता मात्र त्याला ती उघडता येईना मग " आये धार ना आये..." अस करत तो आईला
हाकारू लागला .
आईने थोडा वेळ त्याला पाहिलं मग तिने छत्री हात घेतली आणि त्याला ती उघडून
दिली...
हा पोरात इथे थांबेल तर शप्पथ त्याने पुन्हा ती उघडलेली छत्री घेतली आणि आता
ती pipe मध्ये घुसवून उभी ठेवण्याचा प्रयत्न करू लागल... हें मात्र पटकन
झालं,..
मग बसलेल्या आईचं मांडीत जाऊन अलगद बसला....
मी हें सगळ पाहत होते..मग वाटल आपण पण असच हव... काही प्रयत्न करताना
वैतागायला नको...कधीतरी जमणार ना  आपल्याला एखादी गोष्ट ..
नाही जमली तर कोणी  असेलच मार्ग दाखवायला मग पुन्हा त्यात झोकून द्यायचं ...

-                      -                        *                        -                    -

आणि थोडा वेळ गेला एक bike वाला माणूस paper  घ्यायला आला.. त्या माणसाचा
पेपर  घेऊन होई पर्यंत हें पोरग गप बसेल कि नाही हा side stand जवळ काहीतरी
चाळा  करू लागला
मी नीट बघितल्यावर लक्षात आल कि त्या माणसाने चुकून side stand तसाच ठेवला
होता ,तो वर घ्यायला तो विसरला होता आणि हें पोरग तो आपल्या एवढ्याश्या पायाने
तो वर करत होता..
कुठून आली त्याला हि एवढी बुद्धी ,समज, कुणी न  सांगता मदत करण्याची वृत्ती?
खरच लाज वाटली मला माझी त्या क्षणी ..
कधी मीही आपणही मदत करू या, का सांगूया का... असा विचार करत बसते ..हातून काही
घडत नाही.
कोणाचा पदर कोणाची ओढणी चाकाच्या बाजूला  फडकत असते ते सांगण राहत..
वाटल आपणही बरेच वेळा छोट्याश्या  गोष्टी असतात पण असुदे येईल त्या माणसाच्या
लक्षात अस म्हणून  दुर्लक्ष करतो.
बघू आज पासून हें तरी सांगायला जमत का..


माहित नाही आयेचा छोटासा ल्योक शाळेत जातो  कि नाही, असेल तर कितवीत आहे पण  
मला ह्या दोन गोष्टीत मात्र मला तो साक्षर करून गेला.

Monday, June 11, 2012

प्रिय आई,

प्रिय आई,

दचकू नकोस ,नेमही तुला पत्र लिही लिही करणारी आज मी तुला पत्र लिहित आहे.
काल रात्री खूप खूप आठवण आली तुझी..ढसाढसा रडण्या एवढी ..म्हणा मी रडतच असते कायम ..
" आई, मी तू झालेय... "  " उंच माझा   झोका ग " मधल्या  रमेचं  वाक्य .. इतक  innocent , गोड आवाजातलं  तिच ते वाक्य ..
अगदी  तू नाही तरी थोडी तू माझ्यात आलीयेस याची जाणीव होतेय तेवढ्यात हें वाक्य ऐकल आणि डोळ्यात  टचकन पाणी आल ..
झोपेत माझी कूस बदलली तरी जागी असणारी तू काही झालं तर नाही ठीक आहेस विचाराय्चीस इतका राग यायचा ,पण आता खूप miss करतेय मी तूझ ते विचारण
हें कर ते करू नको ,लवकर ये ,उशीर नको करू
सगळ सगळ कोणीतरी  म्हणाव वाटतंय.. हें म्हणणार म्हणणारे मिळतील ग पण भांडायला कोण मिळणार ?
जे जे काही वैताग  आणणार होत ते ते आता डोळ्यात पाणी आणत आहेत
खूप कचाकचा भांडूनही शेवट  बघ कशी जिरवली कि नाही ,माझाच बरोबर तुझच बरोबर असा ना भागाकार ना क्लेश,द्वेष ,आकस अशी उरणारी बाकी ..
भांडणा नंतर २ मिनिटात सगळ काही विसरून हसणाऱ्या आपण ..
आणी "किती भांडशील आईशी" म्हणून बोलणारी तू ..त्यावर "तू हि भांडलीस कि "म्हणणारी मी ...
आईमुलीच नात हें असच असत का ग? तिथे ना स्पर्धा ना काटे कि टक्कर ..
तिथे असते फक्त एकीला असणारी दुसरीची काळजी , ओसंडून वाहणार प्रेम  ..
एकमेकींची आपण  कितीही  उणीदुणी काढली तरी, कुणी मला बोललं तर जीह्वारी लागल्यासारखी मुलीची बाजू घेणारी तू..
आणि कुणी तुला बोललं तर तुझी बाजू  घेऊन त्यांना समजावणारी मी ..कारण भांडू तर मी फक्त तुझ्याशीच शकते..
कारण हक्काने ज्याला वाट्टेल ते बोलू शकू अशी अजून  तरी तूच आहेस ...
कधी तू खर बोलत असलीस तरी मी पटवून  घेत नाही आणी मग खाल मानेने तुझ्या जवळ येऊन मी चूक कबुल करते.. खूप छान वाटत तेह्वा ..
कधी कधी तुझा रागही येती मला..खोट कशाला बोलू ..
पण  माझ्या बऱ्याच मैत्रिणीशी त्यांच्या आईशी असलेल नात खूप असमंजस ,अवघड वळणावर येऊन जेह्वा थांबत
त्या मला आईचे अवगुण,कमतरता सांगतात तेह्वा मनात येत अरेच्चा तू खूप चांगली आहेस कि...
तुझ्यातल्या काही  गोष्टी  सोडल्या तर तर तू लाख पटीने चांगलीच आहेस ..आणि कमतरता कुणात नसतात ग... माझ्यातही आहेत..
पण तू केलेले संस्कार ,त्यातूनच मी आज जी कुणी आहे ती आहे..
दुसरयाला काहीही देताना नेहमी सढळ असणारा तुझा हातगुण माझ्यातही आलाय..
पण कधी कधी तो आपला दोष ठरला जातो याचा खूप ताप होतो ..तुलाही आणि मलाही ...
तुझ्यासारख कुणाला मदत करताना वाहून जाणारा गुण माझ्यातही आहे ..पण तुझ्यातला कोणी चुकीच बोललं तर तिथल्या तिथे सुनावण जमत नाही ग मला ..
मी रडत असलेली बघून तू चिडतेस ,रडण सोडून जगाला तोंड द्यायला शिक हें तुझ काळजीच बोलण मला आणि  रडवून सोडत ..
पण घराबाहेर पडले आणि तेही आपसूक जमायला लागलाय आता ,तुझा स्पष्टवक्तेपणा माझ्यातही उतरतोय आता..
खर बोलण आणि स्पष्टवक्तेपणा यातला दुवा सांधायला जमायला लागलाय मला ..
तुझ्यातली निर्णय क्षमताही हि येतेय हळू हळू .. रडणही आवरून धरतेय आता..फक्त धाड्कन बोलण अजून स्वभावात नाही बसत आहे
पण मला पूर्ण तू  बनायचच नाहीये अग.. कारण आई हि आईच असते शेवटपर्यंत ..

तुझीच ,
लाडकी लेक
****** (तू मला घालत असलेल्या सगळ्या शिव्या ;)

Thursday, May 31, 2012

अजि म्या ढेकुण पाहिला

रात्रभर आपल्याला चावणारा प्राणी हा डास नसून पुण्यभूमीतला  प्रसिद्ध ढेकुण आहे हें कळल्याबरोबर माझ्या  पाठीखालाची गादीच सरकली.
पुणे तिथे काय उणे असा पुण्यातला खास करून पुणे गावातला  प्राणी ..
इतके दिवस दादा , वहिनी ,ताई यांच्याकडून ढेकूणाच्या  सुरस कथा ऐकताना मजा वाटली होती ,रत्नागिरी- पुणे गाड्यात ते कसे tickets बरोबर free service  मध्ये येतात हें ऐकल होत
 ,पण आपल जळत कि कळत तस आपल रक्त गेल कि खाजत अस काहीस झालं .
तर असा हा इतके वर्ष नाव ऐकून असलेला पराक्रमी,रक्त पिपासू प्राण्याने मला साक्षात दर्शन दिले होते.
सुरवातीला गादीवर काहीतरी तुरुतुरु  चालताना दिसलं..
अस्मादिकांच्या डोक्यावर तुरळक आणि विरळ जंगल असल्या कारणाने मुळातच समस्त स्त्री वर्गाच्या डोक्यात सुखेनैव वावरणाऱ्या जीवांचा अभावच होता , आणि आता अचानक हें कोण  अशा विस्मयचकित नजरेने ती  चाल तुरुतुरु मी पाहत होते ,अचानक माझी नणंद तिथे आली आणि म्हणाली हा ढेकुण ...मी दचकले ..
राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न झाले आणि ते सुखासमाधानाने नांदू लागले तस काहीस माझही चाललं होत .
आईच्या घरातला बॉम्ब आता दुसऱ्याच्या घरात पडला होता ती सुखात होतीच आणि माझंही आता लग्न ,पूजा ,गोंधळ ह्यातून routine सुरु झालं होत .
गावातल्या घरातून लग्नाला म्हणून नातेवाईक राहायला आलेले ,त्यांच्या bags  मधूनच ह्या सैन्याने आमच्या घरात शिरकाव केला होता.
लग्नाचा गोंधळ संपला आणी ह्या मंडळींनी पुरेशी  कुमक  जमवत आपला गोंधळ घालायला सुरवात केली.
सासू सासऱ्यांच्या खोलीत bags  असल्याने तिथून ह्या लढाईला तोंड फुटले
ती दोघ आणि नणंद (जिची  bag त्यांचा किल्ला होती ) hall मध्ये झोपायला लागले , रात्री त्या खोलीत कुणीच नाही म्हटल्यावर हें प्राणी  bedroom  मधून hall मध्ये यायला लागले
येत येत वाटेत आमची  bedroom  लागल्यावर  सहजच इथे काय आहे पहाव तसे काही  जण आमच्याकडे वाट वाकडी करून आले.
एक दिवस मज्जाच झाली ,सकाळी चेहऱ्यावर पाणी मारल आणी आरश्यात पाहिलं तर बाजूला भिंतीवर १०-१२ ढेकुण ..माझी बोबडीच वळली..
झालं  अस होत ,लग्नाआधी मी सुईच्या टोकाएवढी काळी टिकली विशाल भालपटावर टेकणारी आता नवीन वधु वगेरे मुळे जरा ४-५ फुटांवरच्या  लोकांना डोळे मोठे करून दिसेल एवढी टिकली लावायला सुरवात केली होती . त्यातली  एक टिकली छोटा गोल ,त्या खाली आणि एक छोट्टासा गोल अशी थोडक्यात सांगायचं  ढेकुणाच्या आकाराची .. ह्या टिकल्या रोज मी आरश्याच्या बाजूला भिंतीवर चिकटवायचे ..झटांझट मी सगळ्या टिकल्या  सिंक मध्ये टाकून दिल्या .
हळू हळू ४ दिवसात माझ ढेकुण प्रेम इतक वाढल कि कंसाला जसा जळी स्थळी काष्ठी पाषाणी जसा कृष्ण दिसायचा तसे मला ढेकुण दिसायला लागले होते.
पंख्याच्या वर ceiling ला असलेलल्या डासात मला ढेकुण दिसायला लागला,भिंतीवरच्या काळ्या ठिपक्यात मला तोच दिसायला लागला
अस प्रेम माझ्या नवऱ्यावर हि जडल नसेल माझ !!
घरात सासूबाई नणंद ,विस्मयी तो बघ ढेकुण तिथे तुझ्या मानेवर अस करून माझी फिरकी घ्यायला लागल्या होत्या
मी सोफ्यावर बसताना बारीक नजरेने ते कुठे आहेत का पहायचे आणि बसायचे.
ढेकुणाचा पण season  असतो का? उन्हाळ्यात ते येतात का?पावसात ते जातील का?रॉकेल ,डांबर गोळ्यांनी ते जातील का? असे प्रश्न मी आडून आडून विचारायला लागले पण हाय रे कर्मा सगळ्या प्रश्नांची negative  उत्तर यायला लागली .
मी ते मारू का विचारलं तर नवरा म्हणायचा नको मारू एक मारला कि त्याच्या रक्तातून १०० ढेकुण जन्माला येतात.हें ऐकून मला तो प्राणी रावणाच्या वंशावळीतला आणी कलियुगातला चमत्कारी प्राणी वगेरे वाटायला लागला होता .
एके दिवशी माझ्या नवरयाने जादुगाराने काही हवेतून काढावं त्या उत्साहाने  उश्यांच्या  कोनातून असे ३-४ ढेकुण काढून दाखवलन आणि माझं उरला सुराला धीर संपला
त्या उश्या ,लोढ खोलीतून हद्दपार होऊन बाल्कनीत गेले .
कुणी painting  केल कि ढेकुण नाही येणार म्हटल्यावर माझ्या अंगातल ढेकुणांनी जेवढ रक्त शोषल होत तेवढ परत वाढल ..
अखेर गावातून औषध ,पंप  अशी आयुध आणली गेली. सासू सासऱ्यांच्या रूम मध्ये रात्रीची वेळेला त्यांच्या वर हल्ला करायचा ठरला,माझं नवऱ्याने half pant ,कुडतं आणि तोंडाला नक्षलवाद्यासारखा फडका बांधला आणी सगळ्या रूम मध्ये फवारणी चालू झाली, सगळी रूम ओली करण्यात आली.
आधी मी कौतुकाने तो ढेकुण वधाचा सोहळा पाहत होते पण ५ मिनिटातच अतिशय प्राणघातक वासाने मला हैराण केल,हा वास आपल्याला येवढा तापदायक तर ते छोटे जीव नक्क्की मरणार ह्या विश्वासाने मी बाहेर आले. औषध फवारून झालं खोलीच दार बंद करण्यात आले ,माझं  नवऱ्यात  आता मला हिटलर चा अंश दिसायला लागला होता पण कुछा हिटलर अच्छे होते हें !!
लहान मुलं जशी ice -cream  फ्रीज मध्ये set करायला ठेवलं असताना हज्जार वेळा ते झालय कि नाही बघतात तसा  माझा नवरा उत्सुकतेने  खोलीच दार उघडून आत आपण केलेल्या साहसाची फळे पाहत होता ह्या भानगडीत थोडीफार सेना पाठीला खर तर " ढू" ला पाय लावून बाहेर पडली. काहींनी असहाय्य होऊन बाथरूम मधल्या पाण्याच्या बादलीत जीव दिला
आता आमच्या हि खोलीत औषध  फवारणे आवश्यक आहे ,ह्या वेळी दिवसाढवळ्या हल्ला करायचा आहे..मी आज घरी पोहोचले कि  तो ढेकुणकाळ संपलेला असेल  अश्या आशेने ऑफिसला आले आहे.
आता मीही स्वत: थोडी फार का होईना ढेकुण-अनुभव  समृद्ध अशी असल्याने , भुतांच्या गोष्टी जश्या अनुभवी व्यक्ती रस घेऊन सांगतात तशा मीही ढेकुण कथा सांगेन .
अशी हि ढेकुण कथा साठा उत्तरी सुफळ संपूर्ण !!

Thursday, May 17, 2012

फुगे

"अर उडीव  ना फुगे बावळ्या  काय बघित बसल्यास ?" देवा ओरडला  तसा बिट्टू एकदम दचकला .
समोरच्या playground वर  मुलं क्रिकेट खेळत होती. कधी पासून त्याची नजर तिकडेच लागली होती.four ,six जाताच ओरडणारी मुलं,जीव तोडून ball अडवण्याचा प्रयत्न करणारी मुलं ,bat ने फटका मारणारी मुलं पाहण्यात तो अगदी रंगून  गेला होता .
काही न बोलता हातातली रिंग पुन्हा साबणाच्या पाण्यात बुडवून तो फुगे उडवायला लागला ..
१० वर्षाचा  पोर तो .. बाबांबरोबर सकाळ पासून पायाला भिंगरी बांधल्यासारख पुरा गाव पालथ घालायचं  आणि प्लास्टिकचे  पोपट,मोर ,चिमण्या ,कोंबड्याच्या जोड्या  ,फुगे उडवायला लागणाऱ्या साबणाच्या पाण्याच्या डब्या ,गंगावन,रिबिनी  एक ना अनेक वस्तू विकायच्या ...
पूर्वी  खर तर कित्ती आवडायचं त्याला हें  असे साबणाचे फुगे उडवायला ,उडताना पाहायला...
फुग्याच्या बाटल्या  विकत घेतल्यावर लहान मुलं लगेचच त्या उघडून रस्त्यावरच फुगे उडवायला सुरवात करायची
किती छान वाटायचं ते फुगे...
हलके हलके, कधी शुभ्र दिसणारे कधी आत मध्ये वेगवेगळ्या रंगांची वलय आत नाचत असायची ..वाऱ्या बरोबर उंच उंच जाणारे ,एकदम दिसे नसे होणारे ,हातात पकडण्याचा प्रयत्न केला तर नाहीसे होणारे .
कोणी फुगे उडवले कि एकदम पक्ष्यांचा थवा उडावा तसे भर्रकन २०-२५ फुगे रस्त्यवर उडायचे आणि क्षणातच दहा दिशांना उडायचे.चालणारा कोणी एकदम भांबावून जायचा ,कोणी खुश होयचे तर कोणी चिडायचे कोणी आजी चष्म्यावर काय आल न कळून शिव्या द्यायला लागायची तर कोणा शीघ्रकोप्याच्या  डोक्यावर जाऊन बसलेला फुगा इतरांची करमणूक करायचा ..किती हसायचा बिट्टू तेह्वा ..दोन हातांची टाळया वाजवत पोट पुरेस्तोवर हसायचा तो..त्या निरागस हसण्याने त्या फुग्यांना पण आणी जोर यायचा आणि  वर वर आकाशात जायचे ते पठ्ठे  ..देवाने त्याला झापल कि कस बस येणार हसू थांबवत,हसून हसून पाणी आलेले काळेभोर डोळे पुसत  मागे वळून आकाशाकडे पाहत पाहत तो पुढची वाट पकडायचा .
किती हट्ट करायचा तो देवाजवळ त्या फुग्यांसाठी .."आपुनच करतो नव्ह  त्या फुग्यांच्या बाटल्या तयार?? काय व्हइल  एक म्या उडीवली तर ? "
त्यावर देवाच ठरलेलं उत्तर असायचं "माझ्या सोन्या समिजत मला,पण असली चैन  गरीबाच्या पोरांसनी नसती र ,आपुनच अस उडीवायला लागलो तर इकणार काय नि खाणार काय र ?? शाना  माझा बिट्टू तो ,तुला मी चन घेऊन देईन मग..."
हिरमुसलेल तोंड घेऊन बिट्टू चण्याच्या आशेने गप बसायचा .आपल्याकडून विकत घेऊन उडवलेल फुगे बघण्यात समाधान मानायचा .

एक दिवस मात्र देवाने आपणहून त्याल फुग्याच्यी एक बाटली दिली आणी सांगितलं कि तुला उडवयाचेत ना उडव फुगे खुस्श्हाल..
बिट्टू ला  काय बोलाव कळल नाही .आनंदाने त्याने ती बाटली हातात घेतली ..त्या दिवसापासून आज पर्यंत फुगे उडवायला कधी ना नाही केल देवाने...
झाल अस देवाच्या एक दिवशी लक्षात आल कि जर ह्या पोराने फुगे उडवले तर खूप मुलं ते पाहतील आणी विक्री जास्त होईल ,नाहीतरी पोराला फुगे उडवायचे आहेतच एका दगडात दोन पक्षी ...आणी झालही तेच खूप सारी मुलं ते उडणारे फुगे पाहत आई बाबांकडे हट्ट करू लागली ५ रुपयाची मज्जा ..आईवडीलही मुलांना घेऊन देऊ लागले ..
देवा खुश होता आपला धंदा वाढलेला पाहत तेवढेच ५०-६० रुपये जास्त मिळायचे त्यांना,आणी पोराला फुगे उडवायला दिले हें हि सुख हि मिळायचे ...
बिट्टूला काही दिवस फार मज्जा वाटली,जसे जसे दिवस जायला लागले तसे  आपल्या हट्टापायी बाबांना हें कराव लागल हि टोचणी त्याच्या मनाला  लागायला लागली ,आता परत आपण त्यांना सांगितलं कि मला नाही आवडत हें अस फुगे उडवत राहायला.मलाहि क्रिकेट खेळायचं,  four ,six      मारायचेत ..मलाही त्या मोठ्या मुलांसारख खेळायचं  तर पुन्हा त्यांना दुख होईल .आपल्या बालहट्टापायी  बाबांनी जर येवडी झळ सोसून फुगे उडवायला दिलेत तर आता धंदा चांगल होत असताना आपण फुगे उडवायचो थांबलो  तर त्यांना फार दुखः होईल ..काय झाल आपण नाही खेळलो क्रिकेट..पाहता तर येतंय कि ...
एक सुस्कारा सोडून,डोळ्यातलं पाणी झटकून टाकत बिट्टू ने पुन्हा रिंग साबणाच्या पाण्यात घातली आणी एक हलकी फुंकर मारली... पुन्हा ते आनंदाचे तरंग हवेत नाचायला लागले
त्यांना  कुठे कळणार होते त्या इवल्याश्या जीवाचे दुखः..लहानग्या वयातला त्याचा तो समजूतदारपणा ..जीवनाचे वेगवेगळे रंग ..त्यांच्या सारखीच क्षणात नाहीशी होणारी कोणाची रंगीबेरंगी स्वप्न ..ते नाचत होते आपल्याच रंगाची वलय पोटात घेऊन ..उंच उंच आकाशात चालले होते आपल्या नादात  ....