Sunday, August 9, 2020

सात रंगाचे धनुष्य

 सात  रंगाचे  धनुष्य  आई  आकाशात  आले 

चल चल लवकर  पळ  चल  लवकर लपून  कसे  बघ    गेले ||धृ ||


टप टप  टप टप  पडतो  पाऊस,  ऊन हि  त्याच्या  मागून धावे 

किती मस्ती  हि  ओरड  त्यांना,  गुपचूप  त्यांना  सांग  बसावे ||1||


बोलवती  मज  खेळायला,  जाऊ कां ग  त्यांच्या  संगे 

छान किती  बघ  रंग  त्यातले, लपंडाव  हा अवघा रंगे ||2||


अभ्यास बिभ्यास  नको ग  आत्ता , तुझी नि  माझी  करूया  बट्टी 

पावसात  चल  मस्त  भिजूया ,  शाळेलाही  पडली सुट्टी ||3||


सौ.  विस्मयी  भावे - बोकील.

Tuesday, February 12, 2019

अंगाई


हळू हळू हळू हळू  , मिट  डोळे आता बाळा
सोनियाच्या पावलांत ,चांदीचा रे शोभित वाळा ।।ध्रु ।।

चांदोमामा आला बघ रे, सूर्य लोपे आभाळात
आभाळात  लावीत दिवे , आल्या चांदण्या खेळत ।।१।।

रातराणी रे उठली , पसरला गोड  वास
आजूबाजूच्या मैत्रिणी , झोप घेती निश्वासात ।२।।

निज बाळा तू हि आता, झोप माझ्या रे कुशीत
बाळमुठी आपोआप, जाती मुखी रे खुशीत ।।३।।

सौ. विस्मयी बोकील.
१३-२-२०१८

 माझे इवले गोकुळ .. 




माझ्या इवल्याश्या संगे रंगे  इवले गोकुळ.. माझे इवले गोकुळ . ।
जातो कसा बाई वेळ अस्सा चोरपावलाने || धृ ।।


त्याच्या पावलात  माझा जीव मागे घुटमळे ।
जात कामाला  बाहेर कानी वाजती ग वाळे ।।१।।


त्याचे लाघव आठवे , हसू  गालावर खेळे ।
काम राहिले बाजूला माझे पाझरले डोळे ।।२।।


बाळ बसता अंगणी  पसरून खेळ सारे ।
माझ्या घरात सुखाचे बाई वाहती ग वारे ।।३।।


माझ्या इवल्याश्या संगे रंगे  इवले गोकुळ.. माझे इवले गोकुळ .. ।
जातो कसा बाई वेळ अस्सा चोरपावलाने ||

सौ. विस्मयी बोकील. 

Thursday, June 28, 2018

                                      असाही एक सत्यवान ...


       अण्णा आणि आजीला कधी भांडत असलेले पाहिलं असं मलातरी आठवत नाही पण कधी शिळोप्याच्या, सुख दुःखाच्या गप्पा मारतानाही  पाहिलं नाही. माझ्या आठवणीतले अण्णा म्हणजे वेग वेगळया पध्दतीने काहीतरी बनवून आळीभर  वाटणारे ,आणि आज्जी म्हणजे अतिशय गबाळी,अस्वच्छ .. अण्णा कुठेतरी सरदार भवन मुंबईत आचारी म्हणून कामाला होते हे कधीतरी त्यांच्याच गप्पातून ऐकलेले पण ते कधी परत आले,कधी त्यांनी ते काम सोडलं हे सगळं त्या वयात न कळलेलं आणि कळायला लागलं तेहवा कुणी नव्हतंच त्यांच्यातलं.
       चाळीतल्या त्यांच्या दोन खोल्यात आजी खानावळ चालवायची त्यातच आम्ही दोन तीन मुलं सांभाळायला ठेवलेली. म्हणायला दोन खोल्या पण मध्ये लाकडाचा पार्टिशन आणि दार म्हणजे एक पडदा, ओटा  आयुष्यात  कधी धुतला नसेल आणि त्या बाजूच्या फडताळाकडे कधी नजर सुद्धा गेली नसेल, त्याच्या बाजूला कोपऱ्यात एका मोडक्या मखरात चार देव कधी फुल मिळाली तर घातली नाही तर असेच. अण्णा कधी कधी पूजा करताना मी लुडबुड करायचे तिथे. ओट्याच्या बाजूला एक मोरी .. संपलं स्वयंपाक घर. बाहेर एक आरामखुर्ची, एक बाजलं आणि त्याच्या समोर आगगाडी सारखी दुसरी खाट जोडलेली समोरच्या भिंतीवर एक मुलाच्या मुंजीतला एकुलता एक फोटो त्यांच्या तरुणपणीच सुखाचं चित्र दाखवणारा आणि त्याच भिंतीला एक दार शेजारच्या घरात उघडणारं त्यावर माधुरीचा एक मस्त फोटो आणि बाजूला एक फडफडणारं  कालनिर्णय ...
            अश्या ह्या अस्वच्छ घरात मला सांभाळायला ठेवलं ते केवळ आईला पोस्टांपासून जवळ हाकेच्या अंतरावर म्हणून.अण्णा कधी पुदिन्याची चटणी कधी शिजलेल्या बीटाची कोशिंबीर कधी कवठाची बर्फी असं काही करून सगळ्यांना वाटत असत त्या दिवशी त्यांचा सगळा  वेळ हे असं वाटण्यात  जाई. आईने  तर त्या पुदिन्याच्या चटणीच्या वासाने बरेच वर्ष पुदिना आमच्या घरात आणला नाही पण अण्णांचे ते पदार्थ किती जणांनी खाल्ले असतील हा मला  पडलेला प्रश्न अजुनही  अनुत्तरीत आहे. त्यांच्याकडे एका कोनाड्यात एक बाटली असायची मेंथोलची, काचेसारखे काही तुकडे..  एखादा खाल्ला तर गारेगार वाटायचं आणि त्याच्या बाजूला तपकीर ची डबी .. लहान वयात त्याच मला फार कुतूहल असायचं .. प्लास्टिकच्या फुटक्या बादल्या  वितळवून त्या त्यांच्या फाटलेल्या बुटाला जोडणं हा त्यांचा आवडता उद्योग दुसरं काही काम नसल म्हणजे अण्णा हमखास अंगणात बसलेले असायचे आणि बाजूला आम्ही .. कुणाचे नवीन चप्पल आले कि ते स्वतःच्या पायात घालून बघणे हा अण्णांचा आवडता छंद .. माझे प्रत्येक नवीन चप्पल ह्या दिव्यातून जाऊन यायचे.  "अहो अण्णा,बूट फाकतील आणि नंतर आम्हाला होणार नाहीत. "हे आमचा ओरडणे  त्यांना ऐकू पण यायचं नाही अश्या वेळी. कुठलीही वस्तू दुरुस्त करणे म्हणजे अण्णांचं अत्यंत आवडीचं काम आणि त्यांना ती कधी दुरुस्त करायला जमलीय हे मी तरी पाहिलं नाही, शेवटी सगळे पार्टस गुंडाळून दुकानात न्यायचे  हे ठरलेले. आमच्या घरात तर एखाद्याने वस्तू दुरुस्त करायला घेतली कि तुझे अण्णा नाही ना होणार असं म्हणतात. अण्णा राजगजिऱ्याचे लाडू करायचे रवीला फडकं बांधून राजगिरा फोडायचा  मग गुळाचा पाक घालायचा मग ते ,जयूताई आणि कोणी असेल मदतीला कि ते सगळे लाडू वळायचे कदाचित हे सगळं पाहिलं असल्याने मी आयुष्यात कधी ह्या लाडवांना हात पण लावला नाही पण लाडू विकून आलेले सगळे पैसे मोजणे आणि १,२,५,१० अश्या नोटा नीट ठेवणं हे माझं काम .. अण्णा झोपले कि त्यांच्या नाकात रुमालाच टोक घाल, अण्णा बोळातून येत असले कि गजाच्या छोट्या खिडकीतुन त्यांना वॊव  ओरडुन घाबरव, सांभाळायला असलेल्या तिघीं पैकी एक त्यांची लाडकी म्हणून त्याच्याशी भांडण, बालबुद्धीने आपण त्यांच्या नावडत्या  ह्या रागाने  राजगिऱ्याच्या लाडू विकून आलेल्या पैशातले खराब,जुन्या  नोटा, नाणी अण्णांना आणि चांगल्या आजीला दे..   एक ना अनेक आठवणी ...
        अण्णा आणि आजी मिळून कधी बसलेत आणि एखाद काम करत आहेत असं मला पहिल्याच आठवत नाही अण्णांचा पंथ निराळा आणि तिचा निराळा ..ती घरात कधी नसायचीच कुठे मूल सांभाळायला  जा ,पोळ्या कर आणि काही काम कर ..अण्णा आपले घरात .. पण ह्या अस्वच्छ आजीच्या हातात मात्र देवाने कलात्मकतेच लेणं  दिलेले ..रेशीम दोरे विणून ती उत्कृष्ट असे रुमाल विणायची कधी घरात असलीच तर तिच्या हातात कायम रुमाल विणायला घेतलेला असायचा . गुलाबी रेशीम धाग्यांचे छान गुलाब आणि त्याला हिरव्या रेशीम लड्यांची पान आणि भोवती पांढरा धाग्याने सर्व एकत्र विणलेला रुमाल आजही मला आठवतो, रेश्माच्या लड्या  उलगडून द्यायला मात्र मी मदत करत असे ..फार भारी वाटायचं तेहवा त्या वयात..आजीकडून तो रुमाल शिकणं  मात्र राहूनच गेलं .. तिळाचा बारीक हलवा आणि त्याचे  दागिने तर तिनेच करावे. देव कोणाच्या पदरात काय टाकील याचा नेम नाही हेच खरं ..
           आजीच्या लाडाने, खोट  बोलण्याने पोटच्या हुशार मुलाला गमावलं ,पुढे तो गेल्यावर त्याच व्यसन लपवल्याने सून आणि नातू हि प्रेमाला पारखे झाले.  कधी ते  दोघे यायचे पण त्यात आत्मीयता नव्हती आणि कधी मनात येईल तेहवा आजीपण जायची त्यांना भेटायला, कधी तिची पत्र लिहिताना ती दोघे कुठे लांब राहतात एवढच कळत होत.आजीच्या ह्या अश्या कधीही जाण्याने आम्हाला सांभाळायला मग ताईचा प्रवेश झाला कधी अण्णांना लाडू वळायला मदतीला,कधी आम्हाला सांभाळायला अशी वर वरची काम करता करता कधी ती त्यांचा उजवा हात झाली हे कळलंच नाही. पुढे अचानक कॅन्सर होऊन ती गेली आणि मग मात्र आजी आजोबाना त्यांचा भाचा त्याच्या घरी घेऊन गेला, तिच्या जाण्याने जणू घरातला एखादा माणूस गेल्यासारखं त्यांनी धीरच सोडला आणि म्हातारपण आलं त्यांना ..
         गावातली माझी शाळा संपली आणि मीही एव्हाना कॉलेजला  जायला लागलेले , शहरापासून थोड्या नव्या भागात आधीच राहायला गेल्याने गावाशी संपर्कहि कमी होत गेला. त्या जागेशी जोडलेले हे धागेच उसवले जणू .
जेमतेम दोन वर्ष ते भाच्याकडे राहिले असतील. एका १५ ऑगस्टला त्यांना भेटायला जायचे ठरले पण जमलेच नाही. त्यांना भेटायचं नशिबात नव्हतं  बहुतेक, कारण दोन दिवसांनी बातमी येऊन धडकली कि आजी बसल्या जागीच २० ऑगस्टला गेली, तिचे अंतिम दर्शन घेणे जमले नाही तिच्या दहाव्याला तरी जाऊ म्हटलं तर पुढची बातमी आली तिला असं गेलेलं पाहून  "बयो ,मला फसवलस " म्हणून  अण्णा आजारी पडले ते शहरातील एका दवाखान्यात होते. अण्णांना मात्र भेटून येता आलं आणि दोन दिवस जातायत तो अण्णा हि २५ ऑगस्टला गेले. पती निधनानंतर पत्नी शोकाकुल होऊन धीर सोडलेली पाहिलं होत,ऐकलं होत पण असं पत्नी मागून पतीने  प्राण सोडणे म्हणजे सावित्री मागून सत्यवानानेच  जाणे ...
       जिवंतपणी त्यांच्यात प्रेम होत का नव्हतं,का कधी त्यांनी दर्शवल नव्हतं, का एकुलत्या एक मुलाच्या अचानक जाण्याने ती दोन माणस वेगवेगळ्या ध्रुवावर जगत होती माहित नाही पण प्रत्येक वटपौर्णिमेला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरं ... आता आठवलं कि वाटत किशोरवयातील १३-१४ वर्ष ही  तीन माणसं माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होती, माझ्या  शालेय जीवनातील प्रत्येक आठवणीत कुठं ना कुठं ती तिघे होतीच  आणि आता त्या तिघांपैकी कोणीही नसावं ?? जणू माझी ती वर्षेच  कोणी चोरून नेली आहेत, कारण त्यांच्या शिवाय कुठल्याही आठवणी अपूर्णच आहेत आणि राहतील ...

Saturday, March 1, 2014

सृजन






श्या  कसला  नवरा  मिळालाय ? नाही म्हणजे  अस नाही म्हणायचंय कि खूप  वाईट आहे. तसा चांगलाच  आहे ,चांगला म्हणंजे खूप खूप चांगला…. आता म्हणाल येवढा आहे तर वाईट का म्हणतेय ? कारण त्याला कविता ,साहित्य,नाट्यसंगीत  वगेरे कसलही "वेड" नाही आणि मी पडले या सगळ्याची महावेडी. तानसेन नसले तरी स्वघोषित उत्तम कानसेन पण नवऱ्याला  थोडही वेड नसाव या सगळयाच .??     
नाही बाबा match होत हा गुण !! कधी कधी उगाचच एवढ वाईट वाटत  कि हा असला वेडेपणा असता याच्यात तर काय झाल असत ? सर्व सामान्य  लोकांना सुद्धा आवड असते मग हाच चुकला फकीर कुठे फिरायला गेलेला देव आवड वाटत होता  तेह्वा !!

जेह्वा बाकी लोक छान लिहील आहेस ,बरेच दिवसात काही नवीन नाही.  अशी मनाला आवडणारी स्तुतिसुमने उधळत असतात तेह्वा हा मात्र काय लिहील आहेस ते कळत  नाही ज़र सोप्प लिही सांगतो…  अस्सा राग येतो . ह्याला कविता समजवावी लागते between the  lines सांगाव लागत.हद्द झाली बाई!! बर असही नाही कि याची लस टोचून मिळेल आणि हा गुण येईल . मैत्रिणीचा नवरा हि "असाच" unromantic  निघाला कि खळखळून हसायला येत तर काही मैत्रिणी तो तुझ्या कवितांच्या कचाट्यातून सुटला असहि म्हणून मोकळ्या होतात . 

      अस वाटत कि कस समजवावं ह्याला कि लिहिण्यातला आनंद काय असतो? किती miss  करतोय हा हे सगळ . मग उगीचच त्याच्याबद्दल मनात कळकळ ,सहानभुती ,भूतदया ,मळमळ  सगळ काही दाटून येत क़ि किती बिच्चारा आहे हा कि ह्याला काही कळतच नाही . काही दिवस ठुसठुसणारी  जखम  घेऊन फिरते कधीतरी खपली निघते,मग माझ्यात पु . ल.  चा सखाराम गटणे अवतरतो साहित्यप्रेमीच्या रूपात ..

  पण परवाच्या प्रसंगाने मात्र माझे आंधळे साहित्य प्रेम डोळस झाले . नवरोजी एका  project  च design  घरीच करत होते हज्जारवेळा  इकडून तिकडे तिकडून इकडे फेरया  झाल्या ,  मी पाहतेय   हा माणूस कागदावर  एक रेषा काढत नाहीये ,न Auto-cad  open  आहे आणि म्हणे design  करतोय .  Paper ,sheets ,pencil ,board  सगळ bed  वर पसरलेलं जस काही कुणी लहान  मुल अभ्यास करत . चार पाच दिवस हेच चालू आहे . शेवटी  न राहवून  अजून  दोन दिवसानी  मी विचारलच  कि हे काय चाललंय ?? तुझ so  called design  कागदावर येणार कि direct  हवेत बांधणार ? त्यावर  त्याने जे काय उत्तर दिल त्याने माझे तीन तेरा  वाजले ,साहित्याप्रेमाची फुलपाखरे  उडू लागली…  डोळ्यापुढे काजवे ,तारे चंद्र , सूर्य सगळ काही चमकल  . 

 "याला म्हणतात  सृजनापुर्वीच्या कळा ,तुम्हाला काय वाटत design  करा म्हटलं कि होत का करून ?त्याच्यामागेही एक विचार असतो ,एकदा का विचार सुचला कि design आपोआप उमटलं जात  ते सुचवा म्हटलं कि सुचत  अस नसत; एखादी कल्पना सुचेपर्यंत थांबायला लागत " मी दोन क्षण शांत…  मग मनात कौतुकाच्या  उकळ्या फुटायला लागल्या … 
अरेच्चा …   साहित्य काय कला काय दोन्हीमधील  सृजनशीलता  एकाच मापदंडावर नाही तोलता येणार. त्याला   साहित्यातल  नाही कळल   तरी कलेतलं  कळंतच कि . .  सृजनशीलता  जिच्याबद्दल मला आदर आहे कुतूहल आहे ते मी लेखनातून मिळवते तो कलेतून मिळवतो , मी प्रत्येक्षातले कागदावर उतरवते तो   कागदावरच  प्रत्येक्षात ,हाच काय तो फरक  … 
मी मनोमन कृतकृत्य झाले कि असो अगदीच काही आपला नवरा "हा" नाही …जरि त्याला काही कळलं  नाही,अजूनही समजवावं लागत  तरी  मी हल्ली चिडत नाही  मी enjoy करते त्याच ठोंबेपण …  


Tuesday, December 11, 2012

चुकवलेल्या वाटा






दुपारी अवेळीच बेल वाजली , आईने माझ्याकडे पाहिले आणि कोण असणार हे समजून आम्ही दोघी हसलो .
मी दार  उघडले, समोर ती दुक्कलच उभी होती, मी  पुन्हा आईकडे  हसून पाहिले.
सरावल्यासारखेच ते दोघे आत आले आणि सोफ्यावर येऊन बसले .
आईपण  उठून खुर्चीवर जाऊन बसली, आतल्या खोलीत झोपलेले बाबाही उठून बाहेर येऊन बसले.
सगळ काही शिस्तीत झाल्यासारखे त्या दोघांनी बोलणे सुरु केले , आणि आम्ही तिघेही हळू हळू त्यांच्याशी संवाद साधायला लागलो .
ते दोघे जुळे , दिसायला अगदी एक सारखे , काळा  पण चमकदार रंग  आणि डोळ्यात तेजाची चमकही एकसारखीच..
फक्त फरक काय तो बोलण्याच्या पद्धतीत .. एक किती सांगू नको किती नको असा बेभान होऊन बोलणारा एक संयमी ,शांत पणे  बोलणारा  .. त्या पध्दती  वेगळ्या असल्या तरी समोरच्यावर तितक्याच सारख्या प्रभाव टाकणाऱ्या .
मागच्या वेळी वाचायला नेलेले पुस्तक एकाने समोरच्या टेबलवर  ठेवले  आणि ते पुस्तक का आवडले , काय आवडल नाही हे सांगायला सुरवात केली . आम्हीही हसून त्यांचे बोलणे ऐकत होतो.
मग आम्हीही तुम्हाला मोठेपणी कोण होयचं अशी ठराविक साच्यातले प्रश्न विचारायला सुरुवात केली.
शांत असणारयाने   मला शिक्षक होयचे आहे मी मास्तर होणार मोठेपणी.. असे उत्तर दिले
अस का  वाटत तुला विचारल्यावर त्याने  " ते आपल्याला  शिकवतात, छान छान गोष्टी सांगतात, कस वागाव हे शिकवतात ,मला शिकवायला आवडते" अशी खूप उत्तर दिली
दुसऱ्या ने  मात्र मी काही शिक्षक नाही होणार मला  डॉक्टर  होयचंय  अस उत्तर दिल

अशीच ती मुल  समोरच्यांकडे आली कि आमच्याकडे येत होती आणि गप्पांनी आम्हाला वेड  लावत होती
त्यांच्यातले ते तेज हे दोघे नक्की काही बनणार मोठेपणी हे सुचवून जात होते,जुळे असून विचारांचे वेगळेपण आम्हाला दिपवून जात होते,यांच्यात काहीतरी spark आहे असे राहून राहून वाटत होते .

पण एक दिवस अचानक कानावर आल कि बापाने दुसरे लग्न केले , मोठ्या मुलीचे १८ वर्ष होते न होते तोवर आपल्या गावाचाच कुणी पाहून लग्न लावून दिले उरले हे दोघजण  ते  खोट बोलतात , शाळेत मस्ती करतात अशा तक्रारी आमच्या  कानावर यायला  लागल्या 
त्या समोरच्या आजीनीही मुलांविषयी हीच तक्रार केली , आम्हाला नाही हो मुल तर अशी वाटत नाही हि वेडी आशा होतीच.
बापाने कुठून वशिला लावला कळला नाही पण बालसुधारक गृहात त्यांना प्रवेश घेतला , तोवर गुन्हेगार चोरी वगैरे  करणारी मुलच पोलीस त्यात भरती करतात असा  आमचा समज होता .वसतिगृह नावाखाली मुल तिथे राहायला गेली.
क्वचित स्व:ताच्या  लहान सावत्र भावाला घेऊन येत होती , तो तर येवढा शैतान कि समोरच्या बैलाची शिंग पकडायला धावायचा आणि हे त्याच्या मागून धावायचे.
कधी तरी सुट्टीला घरी आले कि ती आमच्याकडे येत होती तिथे कसा tv  चालू असतो , बाकी मुलांमुळे अभ्यास होत नाही हे त्यातला एक सांगत होता.पोळ्या ,भात कसा कमी देतात हे सांगत होती .
हळू हळू  त्यांच्या डोळ्यातील त्या तेजाची जागा आता त्या सुधारक गृहातल्या मुलांच्या कुतूहलाने घेतली होती.
ती मुल कशी चोरी करायची, एकाने कस आईला फसवून पैसे चोरले अशी रसभरीत वर्णने आम्हाला ऐकायला मिळत होती  .
 एकदा  तर वाचायला नेलेल्या  पुस्तकच कव्हर  स्व:ता कडे ठेवून  त्यांनी तसाच ते पुस्तक आणून दिल तेह्वा हळू हळू त्यांच्यातला हा  बदल लक्षात येत गेला .
आम्हीही मग त्याचं येण  कमी होईल हे पाहत गेलो .बाहेर जायचं आहे ; नंतर बोलू अशी फुटकळ कारण देऊ लागलो मग त्यांनी दुसर घर घेतल आणि आपोआपच त्यांचा येण कमी होत गेल.
आम्हीही ते ऐकण्या खेरीज दुसर काय करणार होतो? आमच्या मुलांच  आम्ही पाहू हेच ऐकायला मिळाल असत ,आम्ही मुलांसाठी काही करू शकत नाही हि बोच मनाला लागत होती पण शेवटी त्यांच्या नशिबावर सगळ सोडून आम्ही तो विषय सोडून दिला.

  चुकलेल्या वाटांवरून ज्याने कान पकडून वाट दाखवायची त्यानेच त्यांना चुकीच्या वाटेवर आणून सोडलं होत  का ?, त्यांच्या चुकवलेल्या वाटा  त्यांना कुठे नेऊन सोडणार होत्या ? का शोधतील त्यांच्या डोळ्यातल्या तेजाने ते  आपल्या हरवलेल्या वाट परत?

Wednesday, August 22, 2012

"आये"चा ल्योक ..

आज एकटीच BusStop वर थांबलेले ..company bus यायला अजूनही ५ मिनिट वेळ होता..
नोकरीच काय हें काय ते काय डोक्यात अनंत विचारांची गर्दी
एकटी असले कि सवयीने कानात headphone  घुसावायचा  आणि गाणी ऐकत बसायच.. सवयीने मी headphone कानात घुसवला , इतक्यात दिसलं एक पेपर  विकणारी बाई
पेपरांच्या गठ्यांची मांडामांड करत होती,
एक तारेची जाळी ४ टेकू देऊन रस्त्याशेजाराच्या धुळीत मांडलेली होती आणि त्यावर
वेगवेगळ्या भाषेतले पेपर मांडण्यात  ती दंग होती,शेजारीच तिचा मुलगा खेळत होता ,५-६  वर्षाचा असावा कदाचित ..
तो हि आईला पेपर मांडण्यात मदत करत होता .
पेपर मांडून  झाले म्हटलं आता हें पोरग बसून राहील, तेवढ्यात त्या टुई एवढ्या पोराने  पेपरवाले  मोठी छत्री लावतात ती उचलली..
हा २ फुटी पोरगा आणि छत्री चार साडेचार फुटी अस ते वयात समीकरण जुळवता जुळवता
त्याच तोल जात होता..
एका हाताने छत्री धरली होती आणि एका हाताने तो ती उघडायचा प्रयत्न करत
होता,हें करता करता इकडे तिकडे झेपा जात होत्या तरीही त्याने चिकाटी सोडली
नव्हती
आता मी कानातला हेडफोन काढला  आणि त्याच्याकडे  पाहू लागले..
चेहरयावर  ना कुठे त्रास ना वैताग.. ते पोरग हि स्थिती हि एन्जोय  करत होत...
मधूनच आपल्या झेपा जाण्यावर हसत होत...
मग त्याने त्या छत्रीचा दंड आपल्या पोटावर रुतवला आणि छोट्याश्या हाताने ती
उघडण्याचा प्रयत्न करू लागला .
आता मात्र त्याला ती उघडता येईना मग " आये धार ना आये..." अस करत तो आईला
हाकारू लागला .
आईने थोडा वेळ त्याला पाहिलं मग तिने छत्री हात घेतली आणि त्याला ती उघडून
दिली...
हा पोरात इथे थांबेल तर शप्पथ त्याने पुन्हा ती उघडलेली छत्री घेतली आणि आता
ती pipe मध्ये घुसवून उभी ठेवण्याचा प्रयत्न करू लागल... हें मात्र पटकन
झालं,..
मग बसलेल्या आईचं मांडीत जाऊन अलगद बसला....
मी हें सगळ पाहत होते..मग वाटल आपण पण असच हव... काही प्रयत्न करताना
वैतागायला नको...कधीतरी जमणार ना  आपल्याला एखादी गोष्ट ..
नाही जमली तर कोणी  असेलच मार्ग दाखवायला मग पुन्हा त्यात झोकून द्यायचं ...

-                      -                        *                        -                    -

आणि थोडा वेळ गेला एक bike वाला माणूस paper  घ्यायला आला.. त्या माणसाचा
पेपर  घेऊन होई पर्यंत हें पोरग गप बसेल कि नाही हा side stand जवळ काहीतरी
चाळा  करू लागला
मी नीट बघितल्यावर लक्षात आल कि त्या माणसाने चुकून side stand तसाच ठेवला
होता ,तो वर घ्यायला तो विसरला होता आणि हें पोरग तो आपल्या एवढ्याश्या पायाने
तो वर करत होता..
कुठून आली त्याला हि एवढी बुद्धी ,समज, कुणी न  सांगता मदत करण्याची वृत्ती?
खरच लाज वाटली मला माझी त्या क्षणी ..
कधी मीही आपणही मदत करू या, का सांगूया का... असा विचार करत बसते ..हातून काही
घडत नाही.
कोणाचा पदर कोणाची ओढणी चाकाच्या बाजूला  फडकत असते ते सांगण राहत..
वाटल आपणही बरेच वेळा छोट्याश्या  गोष्टी असतात पण असुदे येईल त्या माणसाच्या
लक्षात अस म्हणून  दुर्लक्ष करतो.
बघू आज पासून हें तरी सांगायला जमत का..


माहित नाही आयेचा छोटासा ल्योक शाळेत जातो  कि नाही, असेल तर कितवीत आहे पण  
मला ह्या दोन गोष्टीत मात्र मला तो साक्षर करून गेला.